माहिती संग्रह | देणगी

श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत

या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करुन व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा.

व्रतासाठी लागणारे साहित्य : हळद कुंकु, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची दोन वस्रे, स्वामींना पाघरायला भगवे वस्र, गुळखोबर, ताम्हन, तांब्या, पळी, अष्टंगंध, जानवं, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले (जास्वंद, चाफा, गुलाब, दूर्वा, बेल, 1 जुडी तुळस, इतर फुले).

पूजा विधी:-
व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सुर्योदयाच्या वेळेस स्नान करुन शुचिर्भुत व्हावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करावी. घरातील देवासमोर एक नारळ, विडा ठेवून (त्यावर नाणं आणि सुपारी) नमस्कार करावा. वडील मंडळीनाही नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा.

फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा. जमिनीवर चौरंग ठेवुन सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्र अंथरुन मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. (वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा) आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजना करीता सुपारी ठेवावी.

उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुंगधी अगरबत्ती धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा.

संकल्प :
मम आत्मनः श्रृतिस्मृतिपुरानोक्तफल प्रात्यर्थम, मम सकल कुंटुंबिनाम, क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्यभीवृध्दार्थम, पुत्रपौत्र, संततिवृध्दी, अप्राप्तलक्ष्मीप्राप्त्यर्थम, प्राप्तलक्ष्मीचिरकाल संरक्षणार्थम्, अदित्यादि सकल ग्रहपीडाशांतर्थम् एवं सकल कामनासिध्दिद्वारा धर्मार्थम् मोक्षफल प्राप्त्यर्थम् श्रीस्वामी समर्थ देवता पूजनं एवं व्रतकथा श्रवणं च करिष्ये ।

असे म्हणून हातातील पाणी ताम्हानात सोडावे. गणपतीचे ध्यान करुन ॐ गं गणपतये नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धिमही, तंन्नो दंती प्रचोदयात।। असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरीता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रीत जल अर्पण करुन सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकु वाहून दूर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची दोन वस्रे, जानवे, अक्षता अर्पण करुन नमस्कार करावा. धूप दीप अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखवावा.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ।। असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकु अक्षता, गंध ,फुल अर्पण करुन अगरबत्ती, धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी. नमस्कार करावा.